Subscribe:

Friday, April 27, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२६.०४.२०१२)

                                                                        हरी ॐ

               ॐ ऎं र्‍र्ही क्लीं चामुण्डायै विच्चे त्रिविक्रमनिलयं श्रीगुरुक्षेत्रम
                         त्रिविक्रम निलयं  आपण बघत आहोत .
विक्रम म्हणजे काय तर साधासुधा अर्थ म्हणजे पराक्रम. ह्याचाच अर्थ मानवाच्या त्रिविध पातळ्यांवर जो विलक्षण पराक्रमी आहे तो त्रिविक्रम.
आपण बघतो भूगोल दररोज बदलत जातो, जिथे आधी चाळी होत्या तिथे आज मॉल बनले आहेत .जो भाग पूर्वी ओसाड पडून होता तिथे आज टॉवर बनले आहेत. आपण जिथे १० वर्षापूर्वी रहायचो ते ठिकाण आज ऒळखता ही येत नाही, एवढे बदल घडलेले असतात.
 मुंबईचेच उदाहरण घेतले तर आपल्याला कळेल, मुंबईत आधी ७ बेटे होती आता त्यांची नावेही कुणाला माहीत नसणार .इंग्रजांना ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारासाठी ही बेटे योग्य वाटली मग इथे व्यापार सुरू झाला. बघता बघता १७ व्या १८ व्या शतकात कुणाच्याही खिजगणतीत नसलेले हे मुंबई बेट अवघ्या १०० वर्षात प्रचंड वाढले. 
१८३० ते १९०० सालापर्यंत मुंबईचा ठराविक भागच विकसित झाला होता. दादर हे तेव्हा जंगल म्हटले जायचे. साईसच्चरितात आपण वाचतो ठाणे जिल्ह्यातील वांद्रे गावी म्हणजे आज जे आपण बांदरा बघतो ते पूर्वी ठाणे जिल्ह्यात होते. आज मुंबई जिल्हा दहिसरपर्यंत पसरला आहे. समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा कालखंड ह्या काळात असेल तर त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात किती बदल बघितले असतील? पण म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल झाला असे म्हणता येईल का? बाह्य जगातील बदलाचा परिणाम मानवावर कसा होत असतो? तर एकाच क्षणाला वेगवेगळ्या व्यक्तीच्या वयानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्याला ते बदल वेगवेगळ्या प्रमाणात जाणवत असतात .
समजा १९०७ साली दोन व्यक्ती आहेत त्यातील एक सुरुवातीपासुन मुंबईत आहे व दुसरी व्यक्ती त्याच वर्षी गावातून मुंबईत आली आहे. इथे एकाच साली दोघेही मुंबईत आहेत पण गावातून मुंबईत येणार्‍या व्यक्तीसाठी मुंबईचा बदल खूप मोठा असतो.
आता इथे शहराच्या जागी आपण आपले जीवन घेऊय़ा व व्यक्ती म्हणून आपण स्वत: असे केल्यावर जो स्वत:च्या जीवनातील होणारा बदल पेलू शकतो तो यशस्वी होतो तर जो हा स्वत:च्या जीवनातील बदल पेलू शकत नाही तो अयशस्वी होतो, हे आपल्या लक्षात येईल.
मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तो तिच्या आयुष्यात तसेच ती ज्या घरात जाणार त्यांच्या आयुष्यातला फार मोठा बदल असतो. इथे त्या लग्न होणर्‍या मुलीची व तिच्या सासूची हा बदल स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यक असते. जर त्या मुलीला कोणी आधीच सांगितले की तू सुरुवातीलाच वेगळी रहा नाहीतर सासू त्रास देईल व हाच विचार मनात ठेवून त्या मुलीने लग्न केले तसेच सासूनेदेखील ही आल्यावर आपली सत्ता जाणार असा विचार मनात ठेवला तर इथे त्या नवीन लग्न होऊन येणार्‍या मुलीची व तिच्या सासूची लग्नानंतर एकत्र कुटुंब राहण्यासाठी आवश्यक असणारा बदल स्वीकारण्याची तयारी नसते व त्यामुळे मग वाद निर्माण होत राहतात. 

बरेचजण दादांकडे येऊन सांगत असतात की , अमुक व्यवसाय केला त्यात यश नाही आले म्हणून मग नोकरी केली त्यातही यश नाही त्यामुळे दुसरा व्यवसाय निवडला त्यातही अपयशच आले. मग ज्योतिषाकडे धाव घेतली त्याने सांगितलेले  उपाय केले तरी ही अजून यश नाही.  

असे का होते ? ह्यासाठी यश कसे येते हे आधी आपल्याला माहिती पाहिजे . 
तर मी ---माझा देव ----माझे यश हा यशाचा त्रिकोण आहे 
व मी माझा नसणे ---- मी माझ्या देवाचा नसणे ----माझे अपयश हा अपयशाचा त्रिकोण आहे.  
ह्याचा अर्थ असा नाही की मी नुसते भजन केले की माझे काम होणारच. हा मूर्खपणा आहे.
इथे मी नोकरी करेन - व्यवसाय करेन , संसार करेन जे काही करेन ते देवाचे नाव घेऊन करेन , देवासाठी करेन. 
देवासाठी करेन म्हणजे काय ? तर आपल्याकडे दोन वर्षापासून चण्डिका प्रपत्ती सुरु झाली तेव्हा मी मस्करीत म्हटले होते की स्त्रियांचे प्रपत्तीविषयी अनेक प्रश्न होते तर पुरुषांचा एकही प्रश्न नाही. खरंतर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या, असे असणे म्हणजे एकदम दोन टोकाच्या भूमिका झाल्या.

स्त्रियांनी त्यावेळी प्रपत्ती कशी केली तर भीत-भीत. म्हणजे प्रपत्ती करताना काही चुकले तर? ही कायम मनात भीती. त्यामुले प्रपत्ती करताना बापू माझा आहे ही भावनाच नाहीशी झाली. 
तर पुरुषांची बापू माझा आहे ही भावना एवढी strong  झाली होती की त्यामुळे मी बापूंचा आहे ही भावनाच त्यातून गेली, त्यामुळे काही ठिकाणी त्रिविक्रमाचा फोटो उलटाही ठेवला गेला, म्हणजेच इथे मी बापुंचा आहे व त्यासाठी जे करणार ते अधिक चांगले व्हावे ह्यासाठी त्यांचे प्रयास कमी पडले. 

पुरुषांचा  बर्‍याच वेळा attitude  कसा असतो तर डोक्याला ताप नको म्हणून नुसते उरकले जाते. पंचशील मध्ये  distinction  स्त्रियांनाच जास्त असतात ह्याचे कारणही हेच आहे. 
पंचशीलच्या बाबतीत मी मागे सांगितले होते की मार्कांचे कुठेही  comparision  नको कारण तुलना आली की आपली प्रगती थांबते. पंचशील परिक्षा मी का द्यायला हवी ? तर माझ्या बापुला आवडते म्हणून आपापल्या  capacity  नुसार पंचशील परीक्षा मला देता आली पाहिजे. 

जर खरंखुरं यश हवे असेल तर सद्गुरु माझा आहे हा दृढ भाव हवा व मी सद्गुरुचा आहे म्हणून सतत परिश्रम हवेत. करा श्रम गाळा घाम ..

साधं उदाहरण घेऊया.. घरात गणपती आणताना एखादी स्त्री कितीही  expert  असली तरी गणपतीचे औक्षण करताना ती ताटातील प्रत्येक गोष्ट २-३ वेळा चाचपून बघत राहील . इथे ओवाळायचे कसे ह्या बाबतीत पण कायम संभ्रम असतो, उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे मग पूर्ण ओवाळायचे की अर्धेच ओवाळायचे असे प्रश्न कायम आमच्या मनात असतात . हे एव्हढे प्रश्न मनात का निर्माण होतात कारण एकच "भीती". साध्या औक्षणाची गोष्ट.. पण हे मी नीट कुठलाही संभ्रम न ठेवता केले तर चांगलेच होणार आहे. माझं औक्षण चांगले व्हावे यासाठी जर मी ह्याचा नीट अभ्यास केला व घरातील एखाद्या वयस्कर स्त्रीस विचारुन ह्याविषयी व्यवस्थित लिहून ठेवले तर असे संभ्रम येणारच नाहीत . 

पण स्त्रिया हे करत नाहीत कारण तिचा ego.  मला एखादी गोष्ट कळत नाही हे कुठल्याही स्त्रीला दुसर्‍यांना सांगायचे नसते. ह्यामुळेच स्त्रियांचा घात होत असतो. पुरुषांनाही हीच गोष्ट लागू आहे आपल्या दरवर्षी होणार्‍या सणांना कशी पूजा केली जाते हे जर आपण एकदाच घरातील वयस्कर स्त्रीस विचारून लिहून ठेवले तर मग दरवेळी पूजा करताना मनात भीती वाटणार नाही. 

घरात अनेक वेळा पादुका पूजन होते त्यावेळीही जर पूजनाच्या वेळी काय काय करायचे हे जर आधीच नीट लिहून ठेवले तर मनात संभ्रम राहत नाही. पण ह्याचा अर्थ हा नाही की सगळे माहीत आहे म्हणून पूजा म्हणजे शारीरिक कवायत नको. इथे जरी ३० वेळा पादुका पूजन केले असले तरी ३१ व्या वेळी देखील पूजन करताना ते प्रथमच करत आहोत असाच भाव, प्रेम तिथे हवे. 

जेवणापूर्वी मी अन्नग्रहण समये म्हणायला सांगितले आहे. मी अनेकवेळा बघतो लोकांचे की अन्नग्रहण समये म्हणण्याऎवजी अन्नपूर्णे सदापूर्णे... अनसुयो अत्रिसंभुतो असे काही पण म्हणणे चालू असते. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे आपण नक्की काय म्हणत आहोत ह्याचेही भान नसते. 

आपण जेव्हा नवीन बूट किंवा चप्पल घेतो तेव्हा भीती काय असते की ही नवीन चप्पल आपल्याला लागेल तेव्हा मग आपण काय करतो जिथे चप्पल लागू शकेल अशा जागी पट्टी लावतो. आपण तिथे चपलेचा जो भाग लागतो तो भाग का्पून टाकतो का? किंवा जिथे आपल्या पायाला चप्पल लागते तो पायाचा भाग कापून टाकतो का? नाही. कारण सवयीने आपल्याला माहिती असते की चपलेचा shape  बदलतो. 

म्हणजेच आपण जी गोष्ट वापरतो त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे की त्यात rapidly  बदल होत असतात. 

ही जशी चप्पलेची गोष्ट सवयीने आपल्या मनाच्या वहीवर कोरली गेली आहे तसेच औक्षणाच्या बाबतीत किंवा पूजेच्या बाबतीत असलेल्या गोष्टी आपल्या मनाच्या वहीवर कोरल्या का जात नाहीत? 

ही खरी गोष्ट आहे की ज्यात व्यक्तीचा भाव गुंतलेला असतो, त्याची सुरक्षितता गुंतलेली असते तिथे काहीही करताना त्याची त्रेधातिरपीट उडते. त्याचे मन त्या गोष्टीत एवढे गुंतलेले असते की तिथे मनाला दुसर्‍या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला जागा नसते, त्याच्यासमोर सगळं विसरायला होते. 
देवाच्या चरणांकडे बघताना, त्याच्या चेहर्‍याकडॆ बघताना त्याच्याकडे मागायला विसरणे ही चांगली गोष्ट आहे, असे जेव्हा घडते तेव्हा तोच मग जे आपल्यासाठी उचित असते ते स्वत:हून पुरवतो. जेव्हा त्याच्याकडॆ बघताना मागणं लक्षात ठेवून आपण मागत बसतो तेव्हा तो ते उशिरा पुरवत असतो. 

संत मीराबाईने त्याच्या नामात गुंग होऊन विषाचे प्राशन केले तरी ते तिच्यासाठी अमृत बनले. इथे चुकीचा अर्थ घ्यायचा नाही, आपल्याला practical  जगात वावरायचे आहे. उद्या तुम्ही मीरेप्रमाणे वेष करून फिरलात तर त्यामुळे काही तुम्हाला कोणी मीरा म्हणणार नाही, तिथे तुम्हांला वेडेच म्हणणार. तुम्ही जर असे विष प्यायला गेलात तर ते त्या विषाच्या गुणधर्मानुसारच काम करणार.    

आमच्या  आयुष्यात आंम्हाला जर कुठलीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्यासाठी आंम्हाला त्याची आधी तयारी करता आली पाहीजे .

समजा माझ्या मित्राने जमीनी घेतल्या व त्यात केलेल्या व्यवसायात त्याला यश मिळाले म्हणून मी ही जमिनी घेतल्या व त्याच्यासारखेच करायला गेलो तर मला यश मिळेल का? कारण इथे मित्राचे परिश्रम, कष्ट मला दिसू शकत नाहीत. आपण फक्त फळ बघतो व फळ बघून शेती करता येत नाही.
मागे मी शेती करायला सांगितली होती तेव्हा काहीजणांनी तांदूळ पेरले होते. तांदूळ पेरून शेती होईल का? म्हणजे आम्हांला माहिती पाहिजे की आम्हांला फळ कशातून मिळेल. 

आम्ही केळी खातो. केळ्यामध्ये बी असते ना? पण हे बी लावले तर झाड येते का? नाही त्यासाठी केळीचे झाडच आणून लावावे लागते. 
आपण कांदा खातो ह्या कांद्याच्या बिया असतात ना? कुणाला माहिती आहे कांद्याच्या बिया कश्या असतात?
कुणाला नाही... सगळे नर्मदेतले गोटे आहेत.
कांद्याच्या ज्या पाती असतात त्यातून मधुनच एक देठ लांब वाढतो त्याला पोंगाडा म्हणतात. त्याला सफेद फुले येतात नंतर हीच फुले सुकल्यावर त्याच्या काळ्या बिया तयार होतात. 
कांद्याच्या बिया cultivate करून पेरल्या तर अमाप पीक येते. पण कांद्याला बघून कांद्याचे बीज दिसते का? नाही. आमचा एक मित्र कांद्याची शेती करून यशस्वी होतो म्हणून मीही काहीही अभ्यास न करता कांद्याची शेती करायला गेलो तर मलाही त्याच्यासारखे यश मिळणार का? नाही. 
जेव्हा आम्ही कुठलीही गॊष्ट करण्यापूर्वी त्याच्या आधीची एक stage  व त्याच्यापुढची एक stage ह्याचा पूर्णपणे अभ्यास करतो तेव्हाच आम्हांला यश मिळते. असा उचित दिशेने प्रवास होण्यासाठी देव आमचा आहे हा प्रथम दृढ विश्वास  हवा. यशाचा त्रिकोण प्रत्येकाला हवाहवासा असतो मग तरीही अपयश का येते? आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्याचा आणि त्रिविक्रमाचा काय संबंध ? 

आपण सुरुवातीला मुंबई शहराच्या उदाहरणात बघितले की आपल्या अवतीभोवती कसे बदल होत असतात. ह्याच प्रकारे कुठलाही व्यवसाय करताना वेळ - काळानुसार त्यात होणारे बदल जाणण्याची व ते झेपवण्याची तयारी आमची असायला हवी.  
काही कारणामुळे मार्केटमध्ये बदल झाला तरी मी तेव्हा काय करणार हे मला माहिती पाहीजे. सृष्टीमध्ये होणारे तसेच माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल पेलण्याची तयारी माझी आहे की नाही हे मनुष्याला आपोआप कळत असते, 

आमच्या आजूबाजूच्या परीस्थितीत होणारे बदल ओळखायचे कसे? ह्या बदलातील माझ्यासाठी चांगले किती वा वाईट किती? हे ओळखण्याची शक्ती आमच्यामध्ये असतेच, जो काही बदल घडतो ते त्यातून चांगले काय व वाईट काय हे कळल्यावर चांगल्याचा उपयोग कसा करुन घ्यायचा व वाईटाचा त्रास कसा होऊ द्यायचा नाही ही शक्ती आमच्यात उपजत असते. हीच माणसाची स्वसंरक्षणाची सहज प्रेरणा आहे. हे ज्ञान प्रत्येकाला जन्मजात असते. मला कशामुळे त्रास होतो व कशाने नाही हे तुमचे तुम्हांलाच चांगलं कळत असते. 

हीच ती ह्या त्रिविक्रमाची तुम्हांला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. पण ही देणगी मनुष्य जोपर्यंत श्रद्धवान आहे तोपर्यंतच उपयोगी आहे जेव्हा मनुष्य श्रद्धाहीन बनतो तेव्हा ही देणगी निरुपयोगी बनते. 

आपण ग्रंथराजात बघितले आहे की मंदोदरी ही रावणाची पत्नी म्हणजे स्वसंरक्षणाची प्रेरणा आहे. जोपर्यंत रावणाने सीतेस पळवून आणले नव्हते तोपर्यंत रावणाला काहीही धोका नव्हता.  
परंतु जेव्हा त्याने सीतेस तिने आपली पत्नी बनावे ह्यासाठी धमकावायला सुरुवात केली तेव्हा मंदोदरीचा  तिच्या पातिव्रत्यावरचा विश्वास कमकुवत झाला तेव्हाच मग पुढे लंका जळाली व रावणाचाही विनाश झाला. 
ही मंदोदरी आमच्याही जीवनात असतेच, 
मला कशाने त्रास होत असतो व कशाने त्रास होत नाही ही ओळखण्याची ताकद आम्हाला त्रिविक्रमाकडून मिळत असते. 

जेव्हा माझी मनाच्या, प्राणाच्या व शरीराच्या ह्या तीन्ही पातळ्यांवर स्वसंरक्षणाची भावना सजग असते तेव्हाच मनुष्य सुरक्षित असतो.

आज leprosy  आजार प्रत्येकाला माहीत असेल. ह्यात शरीराच्या संवेदना जातात. शरीराचे व प्राणाचे नाते असते त्यामुळे ह्याचे परिणाम प्राणांवरही होत असतात. ह्यात शारीरिक पातळीवरची व प्राणांच्या पातळीवरची इजा कळत नाही म्हणून ह्याला महारोग म्हणतात . जेव्हा हीच इजा मनाच्या पातळीवरही जाते तेव्हा मनु़ष्य कोमात जातो . 

माणूस जेव्हा दारु पितो तेव्हा त्याला कशाचेही भान नसते. Medical science  मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, alcohol is a cerebral depressent . दारु माणसाला जिवंतपणी जनावर बनवते, जिवंतपणी तो बेशुध्द असतो त्याचे मनही बेशुद्ध असते. दारुमुळे त्याच्यातला पशू जागृत होतो. म्हणून उद्या कुणी अश्या व्यक्तीला मारायला जाईल तर ते योग्य नाही. ह्याचा कुणीही चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. दारु पिणे हे माझ्या (प.पू.बापू) दृष्टीने एक आजार आहे. 
दारु पिणे एकदम थांबवणे ही देखील एक injury  च असते. alcohol withdrawal मध्ये आकडीही येऊ शकते.
दारु सोडवायची कशी हे डॉक्टरच सांगू शकतो. तो त्या माणसाला तिन्ही पातळीवर मदत करु पाहतो. प्राणाच्या शरीराच्या पातळीवर औषधाच्या मदतीने तो दारु सोडण्यास रुग्णाला मदत करु शकतो. पण मनाच्या पातळीवर मात्र तो काम करु शकत नाही.
परमात्मा मात्र बुद्धीच्या माध्यमातून मनाला सतत उचित दिशेने घेऊन जात असतो . बाबा साइसच्चरीतात सांगतात..."कृतांताच्या दाढेतून काढीन निजभक्ता ओढून.." 

तुम्हांला होणारा कुठलाही रोग हा आधी मनाच्या पातळीवर होतो व मग शरीराच्या पातळीवर होत असतो. 

आम्हांला आमच्या जीवनात अपयशाचा त्रिकोण यशामध्ये बदलायचा असेल तर त्यासाठी त्याच्या technique चा अभ्यास  करून त्यानुसार प्रयास करावे लागतात व ह्यासाठी जी ताकद लागते ती सद्गुरु कथा श्रवणामधून मिळत असते . 

आम्ही एक किलो केळी आमच्या पैशाने विकत घेतली व ती खाताना सालींसाठी पण पैसे दिले आहेत म्हणून साली पण खाल्ल्या तर चालणार का? त्याने काय होणार? पचनाला त्रासच होणार.. आम्हांला लोकं लोभी म्हणणार. लोभामुळेच मनुष्य मुर्ख बनतो. एका किलो मध्ये केळ्यासोबत सालींचेही वजन आले म्हणून ती खाणे योग्य नाहीच .
तुम्हांला त्याने कर्म स्वातंत्र्य दिले आहे म्हणून कसेही वागून चालणार नाही. जेव्हा मी कर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो म्हणजे मी केळी सालीसोबत खातो. व केळ्याची साल ही बाहेर असली तरी त्यावरुन घसरायला होते व शरीरात असली तरी ती घसरवतेच
आज आपण त्रिविक्रम निलयं बघितले... पुढच्यावेळी आपण त्रिविक्रमाचे कार्य कसे असते ते बघणार आहोत 

2 comments:

pranit said...

shree ram!! :)

Unknown said...

श्रीराम !!

Post a Comment