Subscribe:

Tuesday, May 29, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०५.२०१२)

खराखुरा एकमेव सद्‍गुरु आहे तो ओळखायचा कसा? ...तो जोपर्यंत स्वत:ला कर्माच्या अटळ सिध्दांताशी बांधून घेत नाही तोपर्यंत मानवाला त्याच्याशी बांधून घेता येत नाही. 

जे डोळस असून त्याला समोर असूनही बघू शकत नाहीत ते खरे आंधळे. ज्या डोळ्यात गुरुची image नाही तो मांसाचा गोळाच आहे. गुरुकडे बघणे ही देखील एक सेवाच आहे, त्याच्याकडे बघता बघता प्रेम दाटून आले की त्याचे गुण आपोआप आठवू लागतात.

तो एकदा का अवतरीत झाला की त्याच्या अस्तित्वामुळे अख्खी पृथ्वीच गुरुक्षेत्रम्‌ होते. तुम्ही मग जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही त्याचे नाव घेत असाल तर तुम्ही गुरुक्षेत्रम्‌मध्येच असता.

गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तुमची त्याच्याकडे पाहणारी एकमेव दृष्टी. तुम्ही त्याच्याकडे पाहणे हेच तुम्हांला सर्व समर्थं सर्वार्थसमर्थं बनवते. 



Read more on .... 


http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=41&lang=4

Saturday, May 5, 2012

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.०५.२०१२)

॥ हरि ॐ ॥

                                 श्री गुरुक्षेत्रम मंत्र आपण बघत आहोत.. 
                                    ॐ ऎं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे...

माझ्या लहानपणी एका कीर्तनकाराच्या घरी ऎकलेली एक गोष्ट आठवते. एका गावात एक शंकराचे देऊळ होते. एक दिवस सकाळी जेव्हा सगळे गावकरी देवळात जातात तेव्हा देवळातील शिवलिंग गायब झालेले असते. हे शिवलिंग स्वयंभू होते म्हणजेच जमिनीतून वर आलेले होते त्यामुळे कोणी चोरून न्यावे तर तसा खड्डा खणलेला पण दिसत नव्हता.

सगळीकडे शोधाशोध सुरू होते, पहिल्या दिवशी कोणाला वाईट वाटते, कोण उपवास करते, कोण नवस करते.
दुसर्‍या दिवशी पण तसेच तिसर्‍या दिवशी पण शोधाशोध चालूच, असे करता करता १०-१५ दिवस जातात.
असे देवाशिवाय देऊळ किती दिवस ठेवायचे असा गावकर्‍यांना प्रश्न पडतो शेवटी सगळे एकत्र येतात व एका मूर्तिकाराला सांगून नवीन शिवलिंग बनवायचे एकमताने ठरते. असे नवीन शिवलिंग बनवून झाल्यावर त्याची गावकरी वाजत गाजत गावात मिरवणूक काढतात व त्याची प्राणप्रतिष्ठापना त्या देवळात करतात.

पुढे मग त्या दिवसापासून पुन्हा त्या देवळात आधीसारखेच सर्व पूजा उपचार सुरू झाले. एवढी गोष्ट सांगून झाल्यावर कीर्तनकार बुवा थांबायचे व लोकांना प्रश्न विचारायचे की, पहिला देव कुठे गेला? ह्याविषयी गावातील लोकांचा विचार ४ दिवसात संपला. पहिला देव गेल्यानंतर मंदिर रिकामे कसे ठेवायचे म्हणून लगेच दुसर्‍या दिवसापासून नवीन देवासाठी विचार सुरू झाला. वाजत गाजत सर्वांनी नवीन देव मंदिरात आणून बसवला मग तेव्हा त्या पहिल्या देवाला काय वाटले असेल?

कीर्तनकार बुवांच्या ह्या प्रश्नाने ऎकणारे सर्वजण अंतर्मुख व्हायचे. प्राणप्रतिष्ठा करून नवीन देव बसवला पण पहिल्या मूर्तीचे काय झाले? हा प्रश्न कोणालाच पडत नाही. काही जण ह्यावर म्हणत, "देवाच्या मूर्तीत कसा फरक असणार? दोन्हीही एकच." ह्याचा अर्थ काय?
म्हणजेच माणसाला काय हवे आहे तर माणसाला त्याच्या सोयीनुसार देव हवा असतो. मंदिरात त्याची जी जागा आहे त्याच जागेवर त्याने बसायला हवे. इतरत्र त्याने कुठे जाता कामा नये. आम्ही ज्या जागेवर ठेवणार त्याच जागेवर तू बसायला हवे मग आम्ही तुझे सगळे लाड करू, तुला नवैद्य देऊ तुला नवस करू पण जर तू तुझी मंदिरातील जागा सोडणार असशील तर मात्र तुला आम्ही लगेच replace करू.

माणसाला देव कसा हवा तर आम्ही जे जे काही मागू ते ते सगळे पुरवणारा. त्याने त्याची मंदिरातील जागा सोडलेली आम्हांला चालत नाही. पण आम्हांला जर काही problem असेल तर मात्र त्याने धावून यावे. मग कीर्तनकार बुवांनी विचारले, "देव तुमच्या मदतीला मूर्तीतून धावून येतो ना?’ त्यावर गावकरी म्हणाले, "देव शिवलोकातून नाहीतर विष्णूलोकातून धावत येतो, आम्हाला तिथे जाता येत नाही म्हणून आम्ही देऊळ बांधतो.’

त्या कीर्तनकार बुवांनी ४-५ गावात हीच गोष्ट सांगितली पण कुठेही त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले. मी(प.पू.बापू) त्यांना विचारले तुम्ही प्रत्येक गावात हाच एक प्रश्न का विचारता? त्यावर कीर्तनकार बुवांनी सांगितले, "मला माझा देव शोधायचा आहे. माझ्या मंदिरातील जो देव हरवला आहे तोच मला जसा होता तसा अखंड हवा आहे, ही जी गोष्ट मी सांगतो ती माझी स्वत:चीच आहे.” मी विचारले, "पण तो कधी हरवला? "किर्तनकार बुवा म्हणाले, "ज्या क्षणी मी पहिल्यांदा रडलो तेव्हा म्हणजे मी जन्माला आलो तेव्हा, त्याला कसे शोधायचे ते मला कळत नाही, बाहेर कुठेही तो सापडत नाही आणि सापडलाच तर त्याला आत कसे घालायचे ते मला माहीत नाही, मला माझ्या देवाला शोधायचे आहे"

मी म्हणालो, "मी पण येतो तुमच्या सोबत", कीर्तन कार बुवा म्हणाले, "ठीक आहे".
पुढच्या गावात जाण्याआधी मी म्हणालो, "आपण ह्या गोष्टीत थोडा बदल करूया, पहिला देव हरवल्यावर जेव्हा नवीन देवाची वाजत गाजत प्राणप्रतिष्ठा होते. त्यानंतर महाशिवारात्रीच्या दिवशी पहिला देव प्रगटतो, मग बघूया लोकं काय उत्तर देतात" कीर्तनकार बुवा म्हणले, "ठीक आहे" मग पुढच्या गावात गेल्यावर ठरल्याप्रमाणे गोष्टीत बदल करून सांगतात व गावकर्‍यांना प्रश्न करतात अशावेळी काय करायचे?" कुणालाच ह्याचे उत्तर देता येत नाही, अशी १०-१२ गावे फिरतात त्यांना उत्तर मिळत नाही, शेवटी मी म्हणालो आपण एका गावात जाऊन मूर्ती चोरूया व नंतर नवीन देव आणणार तेव्हा परत पहिली मूर्ती ठेवू.

त्याप्रमाणे पुढच्या गावात जाऊन देवळातील मूर्ती चोरली... देवळात मूर्ती नाही हे पाहून दुसर्‍या दिवसापासून गावकर्‍यांची शोधाशोध सुरू झाली शेवटी नवीन मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली गेली. पुढे मग त्या दिवसापासुन पुन्हा त्या देवळात आधीसारखेच सर्व पूजा उपचार सुरू झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही पहिली मूर्ती देवळात रात्री आणून ठेवली... दुसर्‍या दिवशी आधीची मूर्ती पण देवळात पाहून सगळ्यांना प्रश्न पडला आता काय करायचे?

कारण आधीची मूर्ती ही स्वयंभू होती व नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली होती, मग एकजण म्हणाला नवीन मूर्तीचे विसर्जन करूया कारण आधीची स्वयंभू आहे म्हणजे अधिक महत्त्वाची आहे. जास्त powerful आहे.
म्हणजे आम्हांला देव कसा हवा विसर्जन करता येईल असा...

मग सर्वानुमते नवीन मूर्तीचे विसर्जन करुन आधीच्या स्वयंभू मूर्तीचे परत विधीवत पुजन सुरु होते. हे पाहुन मी कीर्तनकार बुवांना सांगितले, "ह्या आधीच्या मूर्तीला थोडा छेद दिसतोय" त्यावर कीर्तनकार बुवा म्हणाले, "अरे बापरे म्हणजे मूर्ती खंडित दिसते!! आणि खंडित मूर्ती देवळात कशी ठेवायची? "हे ऎकून तेथील एकजण म्हणाला" खंडित मूर्ती देवळात ठेवता येणार नाही ह्याचे विसर्जन करूया"
मग परत तिथे नवीन मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठापना केली गेली.

ह्याचा अर्थ काय तर देवाची मूर्ती आम्हांला पाहिजे तेव्हा स्वयंभू हवी असते, पाहिजे तेव्हा ती प्राणप्रतिष्ठापना केलेली चालते, आणि पाहिजे तेव्हा विसर्जन करता आली पाहिजे. आम्हांला देव कसा असावा तर त्याने मंदिरात बसावे आम्ही जे काही पुस्तकात ग्रंथात सांगितलेले आहे त्याप्रमाणे जे काही उपचार करू, त्याला देऊ ते त्याने स्वीकारायला हवे. आम्हांला पाहिजे तेव्हा त्याने आमच्या संकंटाचा परिहार करायला हवा, आम्ही शास्त्रोक्त पध्दतीनुसार ज्या दिशेने सांगू त्याच दिशेने त्याने मंदिरात बसायला हवे, जर आम्हांला त्याच्यात शास्त्रोक्त पध्दतीनुसार काही चुकीचे वाटले तर आम्हांला पाहिजे तेव्हा आम्ही त्याचे विसर्जन करू.

काही दिवसांपूर्वी पूजनासाठी घरात एकाच देवाची एकच मूर्ती असावी असे मी सांगितले होते. कारण तुम्ही जेव्हा त्या देवतेची पूजा करता किंवा स्तोत्र म्हणता तेव्हा ती स्पंदने जरी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली नसली तरी त्या मूर्तीकडून तुम्हांला ती मिळतच असतात. जर एकाच देवाच्या दोन मुर्त्या असतील तर ही स्पंदने divide होतात. म्हणुन पूजनासाठी घरात एकाच देवाची नेहमी एकच मूर्ती असावी.  

आतापर्यंत कुठल्याही देवतेच्या मूर्तीचे डोळे तुम्ही बंद बघितले आहेत का? नाही.. कारण आम्ही जे काही देवावर दहा वेळा पॆसै ओवाळून टाकत असतो ते त्याने बघायला हवे असे आम्हांला वाटते.

लक्षात ठेवा आम्हांला जसा पाहिजे तसा देव होणे हे बापजन्मात शक्य नाही.
आम्हांला पाहिजे तसे तो बोलणार आमच्या विचारांनुसार तो वागणार, असा आम्हांला पाहिजे तसा देव होणे कदापि शक्य नाही.
विचार करा तुमच्या विचारांच्या मर्यादा किती असणार? त्याची ताकद किती असणार? जर तुम्हांला तुमच्या विचारांनुसार देव हवा असेल तर त्याची ताकद तुमच्या विचारांनुसार मर्यादित असणार म्हणजे किती कमी असणार?
बघा रावणाने काय वर मागितला... मला देवाकडून मृत्यू नको, राक्षसांकडून नको, अप्सरांकडून नको, प्राण्याकडून नको अग्नी ने नको, शस्त्राने मृत्यू नको, रात्री नको दिवसा नको, त्याने त्याच्या विचाराच्या कुवतीनुसार सर्व संभाव्य गोष्टींकडून मृत्यू नको म्हणून मागितले, हिरण्यकश्यपुने देखील तसेच मागितले होते... पण तरीही देव त्याच्या कल्पनेच्या पलीकडेच राहीला. देव त्याच्या साठी अर्धा मानव अर्धा प्राणी असा नरसिंह अवतार घेऊन स्तंभातून प्रगटला, शस्त्र नको म्हणून हाताच्या बोटांनी त्याला फाडले, रक्त जमीनीवर पडता कामा नये असा त्याने वर मागितला होता म्हणून त्याचे रक्त प्राशन केले,

रावण व हिरण्यकश्यपुने दोघेही उच्च शिक्षण घेतलेले होते... पण काय झाले शेवटी?
देवाला तुमच्या विचारांमध्ये का घालायला बघता? देव जसा आहे तसा स्वीकारा.
"कुठेही जा काहीही करा, तुमच्या इंत्यंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागतील"

तुम्ही म्हणता ना देव नवसाला पावला पाहिजे मान्य आहे. देवाची आरती, पूजा केलीच पाहिजे पण एक प्रश्न तुम्हांला विचारतो, जेव्हा सृष्टी उत्त्पन्न झाली तेव्हा त्या देवाची आरती करायला कोण होते, कुठलाही जीव होता का तेव्हा? आणि जेव्हा तो अडीच हजार वर्षानंतर येणार आहे सर्व काही नष्ट करण्यासाठी तेव्हा 
"देवा तू प्रलय करू नकोस " असे तुम्ही म्हटले तरी तो तुमचे ऐकणार आहे का? नाही.

म्ह्णून ही कीर्तनकार बुवांची गोष्ट मला आवडते. देव मला पाहिजे तसा हवा असा हट्ट कधी करू नका कारण असे झाले तर त्याची ताकद अतिशय कमी असणार.

ग्रंथराजमध्ये आपण वाचले की जीवात्मा व परमात्मा म्हणजे काय?
जेव्हा परमात्मा एक मनुष्य बनवतो तेव्हा त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब करीत नाही. तो प्रत्येक मनुष्य बनवताना त्याच्याकडे त्याच्या आईने दिलेल्या प्रत्येक गुणांचे बीज त्याच्यात टाकतोच. फक्त प्रत्येकाच्या भक्तीनुसार, पाप पुण्याच्या हिशोबानुसार त्याचे percentage कमी-जास्त असते.

त्याची इच्छा काय आहे?  तर प्रत्येक मनुष्याने मी जे दिलेले गुणधर्म आहेत ते वाढवत माझ्या आईच्या मांडीवर जाऊन बसावे. ह्याचा अर्थ प्रतिपरमात्मा बनण्याचा विचार करावा असा नाही तर तो जसा त्याच्या आईच्या चरणांशी बसला आहे तसेच प्रत्येक मनुष्याने त्याच्या ह्या बापाच्या चरणाशी असावे.
त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे जे काही जीवत्म्याला दिले आहे ते ते त्याने त्याच्या capacity नुसार वाढवावे.

जेव्हा आम्ही आमच्या मनानुसार देवाला मागतो तेव्हा आमच्याकडे त्याची ताकद कमी येत असते.

परमात्म्याकडून कितीही घेतले तरी ते कमी होत नाही ते अक्षय्य असते. जेव्हा तो आहे तसा आम्ही त्याला स्वीकारले तर त्याला जे द्यायचे आहे ते तो ते बरोबर देतो.
तू जे इच्छिसी तेची घडो... नाही तकरार राघवा.

समजा एका मनुष्याने मशीनच्या सहाय्याने १००० टन वजन उचलले पण तो पृथ्वीला उचलू शकतो का? बापजन्मात ते कोणाला शक्य होणार नाही.

म्हणजेच ह्यावरून कळेल की युगानुयुगे ज्याने पृथ्वीला अधांतरी तोलून धरले आहे त्याची ताकद किती असणार? तुम्ही त्याला मोजू शकता का?

नारदाने त्याला तोलले होते पण ते राधेच्या एका तुळशी पत्राने.
जेव्हा आम्ही देवाला आमच्या देवाला तराजूत बसवून तोलायला बघतो तेव्हा जेवढी आमची ताकद तेवढाच आमचा देव आमच्यासाठी असतो.

हरिला तोलण्याचा प्रयत्न करू नका इथे फक्त प्रेम करा, विश्वास ठेवा.

देवाला तराजूत ठेवायला गेलात आणि म्हणालात रामाने ही चूक केली. कृष्णाने ही चूक केली की समजायचे देव आमच्या मदतीला नाही.

माझा देव हा उचितच आहे ही भावना नसेल तर देव कधीच कळणार नाही आणि फळणारही नाही.

आपल्या कुलदेवते बद्दल आपल्याला काय माहीत असते. पण भीतीपोटी आम्ही वर्षानुवर्षे जे जे कोण काय सांगितील वयस्कर मंडळी ते ते घाबरून कुलदेवता कोपू नये म्हणून करत असतो.

परमात्मा हा कधीच भीती वाढवत नाही तर तो तुमची भीती घालवत असतो. म्हणून त्याला तराजूत घालून मोजू नका. तरीही तुम्हांला जर मोजायचे असेल तर मी तर म्हणेन मोजून पहाच त्याला कारण शेवटी त्या तराजूला हलवायचे कसे हेही त्याच्याच हातात आहे. त्यामुळे तुम्हांला full challange आहे ह्यासाठी.
माझ्यावर प्रेम करत असाल तर खरंखुरं सांगतो असे केले तर तुमच्याच अंगाशी येईल.

रावण व हिरण्यकश्यपु दोघेही चारही वेद, उपनिषदे शिकलेले होते, रावण शिवाचे नामसंकिर्तन अतिशय उत्तम करायचा पण काय उपयोग? शेवटी त्याची दुर्दशा का झाली? कारण तो तराजू घेऊन बसला.

इथेच आपल्या समोर त्रिविक्रमनिलयं येते. 
आमच्या प्राणमय, मनोमय व भौतिक देहावर ह्या त्रिविक्रमाचे साम्राज्य असते.
तुम्ही जे काही विचार करत असता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय विचार करत नाही अशा स्थितीतही तो सर्व काही जाणत असतो.
तुमच्या गाडीचा accident होणार असतो, तुम्ही बेसावध असता अशा वेळी तुमच्या गाडीचे टायर कसे पंक्चर करायचे ते तोच जाणतो.

इथे तो आमच्या त्रिविध देहाचा स्वामी आहे म्हणून तो सर्व जाणतो असा विचार करणे म्हणजे सुद्धा त्याला तराजूत तोलणेच होय.
माझ्या देवाला सगळं कळतं हा भक्ताचा तराजू असतो.
माझा का? हा प्रश्न जिथे संपतो तेव्हा तिथे देव उभा असतो. जिथे का? हा प्रश्न आहे तिथे देव नाही. जोपर्यंत तराजू घेऊन फिरता तोपर्यंत माझ्या देहात, माझ्या मंदिरात देव नसतो. का? संपला की देव मंदिरात येऊन बसला म्हणून समजा.
आम्ही नोकरी का करतो? पैसे पाहिजेत म्हणून. पैसे का पाहिजेत? हा का? कधीच संपत नाही.
आम्ही जन्माला का आलो? आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले? त्यांच्या आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले? त्यांच्या आईबाबांनी जन्माला घातले म्हणून. ते का जन्माला आले?

असे किती का तुम्ही मोजणार? असा का कधीच संपणार नाही. असं का? करत आमचा माणसापासून माकडापर्यंत पुर्नप्रवास सुरु होतो.
जोपर्यंत का आहे तोपर्यंत देव नाही, मंदिरातील देव हरवला तर परत बसवायचा का? हा का प्रश्न संपवला की देव मंदिरात येऊन बसतोच.

माझ्या देवाला सगळं कळतं हा भाव हवा.

तो तुमच्या मर्यादेनुसार नाही तर त्याच्या कुवतीनुसार कार्य करत असतो आणि हेच त्रिविक्रमनिलयं.

हे सद्गुरु तत्त्व तुमच्या अंत:करणात येऊन राहते ते तीन विक्रम बनून

१) तो आहे म्हणजे जसा मी आहे हे खरं आहे तसाच तो आहे हे ही खरं आहे
२) तो माझा आहे व मी त्याचा आहे
३) तिसरा विक्रम ह्यालाच अंतिम विक्रम म्हणतात तो का आहे? चे विसर्जन.
त्याच्या बाबतीत सर्व का? चे विसर्जन म्हणजे अंतिम विक्रम

मनात का? आला की समजायचे मंदिरातला देव चोरीला गेला. जिकडे का? हा शब्द नाही तिथेच तो हरिहर सद्गुरु येऊन राहतो.
त्याच्यातला प्रत्येक गुण त्याने तुम्हांला दिला आहे म्हणून तुम्ही त्याचे सख्खे नातेवाईक आहात. हा एकमेव असा आहे की ज्याने सगळ्यांना त्याची पूर्ण बीजे दिली आहेत.

राजांनो आज का? ह्या प्रश्नाला तिलांजली देऊ या. त्याच्या बाबतीत कधीच का? हा प्रश्न विचारू नका.
परशुरा्माला त्याच्या पित्याने जमदग्नीने म्हणजेच त्याच्या गुरुने आईचे मुंडके उडव अशी आज्ञा केली त्याने कसलाही विचार न करता कुठलाही प्रश्न न विचारता तसे केले. परशुराम अतिशय मातृभक्त. परत जेव्हा त्याच्या पित्याने वर मागण्यास सांगितला तेव्हा माझ्या आईला जिवंत करा हाच वर त्याने मागितला.

आज मी तुम्हांला सांगतो राजांनो माझ्या आईला तुमच्या मनात जिवंत करा. तिचे मुंडके प्रत्येक जन्मात ऊडवले जाते ते थांबले पाहिजे.

का? हा प्रश्न म्हणजे रेणुकामातेची मुंडके उडवण्याची सांकेतिक कथा. ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर कार्य करत असते.
रेणुकामाता म्हणजे आमच्यातील स्तंभनशक्ती. का? हा प्रश्न आला की हीचे मुंडके उडते तिने कधी तिच्या आयुष्यात का? उच्चारला नव्हता तरीही रेणुकामातेला हा शाप का? तर आश्रमाजवळ जलविहार करणार्‍या राजाला क्रीडा करताना त्याच्या प्रेयसीने असे करु नको म्हणून सांगितले. त्याने का? प्रश्न विचारला त्याची प्रेयसी म्हणाली हे योग्य नाही. परत त्याने का प्रश्न विचारला. ही पवित्र जागा आहे. त्याने पुन्हा का विचारले. त्याच्या तीन वेळा का? हे तीन का? प्रश्न रेणुका मातेने ऐकले तोपर्यंत ती तेथे थांबली म्हणून तिचे मुंडके उडाले. आमच्याकडे परशुरामाची ताकद नाही तिला परत जिवंत करण्याची.

तुमच्या मनात जर परमात्म्याला कायम ठेवायचे असेल तर त्याच्या आईचे मुंडके उडवणे थांबवा... मग त्या कीर्तनकाराला ही गोष्ट सांगावी लागणार नाही.

आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या तिथीला हजारो वर्षांपूर्वी रेणुका मातेचे मुंडके उडवले गेले होते व परत जोडले गेले होते. म्हणून आजच्या दिवशीच हा का? थांबवा... खूप झाले तराजू घेऊन तोलणे ह्यापुढे नको. आता प्रेमाने आपण गुरुक्षेत्रम मंत्र म्हणूया.

॥ हरि ॐ ॥